डॉ. नमिता कोहोक यांचा 'मिसेस सूर्यदत्त २०२२', 'सूर्यभूषण २०२२' पुरस्कारांनी गौरव
सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने नवीन वर्ष सुरु होत असताना कोविड काळातील ऑनलाईन सवयींना छेद देत प्रत्यक्ष वर्गात उपस्थित राहून शिक्षण घेण्याची सवय लागावी व त्यासाठीची एकाग्रता वाढावी म्हणून आयोजित ओरिएन्टेशन कार्यक्रमात डॉ. कोहोक बोलत होत्या. डॉ. कोहोक यांनी आपली प्रेरणात्मक, संघर्षपूर्ण जीवन कहाणी विद्यार्थ्यांना सांगत अनेक कानमंत्र दिले. यावेळी त्यांना सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या हस्ते 'मिसेस सूर्यदत्त २०२२' व 'सूर्यभूषण २०२२' या पुरस्कारांनी गौरविण्यात आले. यावेळी निवृत्त कर्नल सुरेश पाटील उपस्थित होते.
डॉ. नमिता कोहोक म्हणाल्या, "रस्त्याने जाताना अनेकदा जोरजोरात सायरन ऐकू येतो. त्यावेळी कोणीतरी जीवन मरणाची झुंज देत असतो. अशावेळी आपली छोटीशी मानवताही त्यांना जीवनदायी ठरू शकते. रुग्णवाहिकेला जाण्यास प्रथम जागा करून द्यावी. 'मदर्स डे' साजरा करतो. पण आईचा एक दिवस नसतो. तर आईमुळे आपला दिवस असतो. जीवन-मरणाची झुंज देताना मला या गोष्टी उमजल्या. कंपनीच्या लोगोच्या अनावरण सोहळ्याला ३०० लोकांनी यायचे कबुल केले होते. मात्र प्रत्यक्षात केवळ १२ लोक आले. तेव्हा मला खूप वाईट वाटले. पण वडिलांनी धीर दिला. त्याच प्रेरणेतुन तीन शाळांपासून देशभरातील १३२ शाळांचे काम विस्तारले आहे. ४४ सहकारी माझ्यासोबत काम करत आहेत. यातील ४० टक्के लोक कँसर पीडित आहेत. दुसऱ्याच्या वाईट काळात त्याला मदत करणे म्हणजे सुख असते असे मला वाटते."
"मिसेस इंडियासाठी रुग्णालयातील नर्सने माझा अर्ज भरला होता. अशी माणसे भेटल्याने मला त्या स्पर्धेत यश मिळाले. सामाजिक कामासाठीच्या सौंदर्य स्पर्धेत हॉंगकॉंग येथे गेले. पैठणी घालून रॅम्पवर चालल्यावर मला खास माझ्या पारंपरिक पोषाखासाठी 'ग्लोरी ऑफ ट्रॅडीशन' म्हणून नावाजले गेले. 'मिसेस इंटरनॅशनल वर्ल्ड वाईड' अशी उपाधी घेऊन परत आले. त्यानंतर मी त्या नर्सला भेटून तो मोठा क्राऊन दाखवला आणि त्यांना मनापासून धन्यवाद म्हटले. मिसेस ग्लोबल युनायटेड २०१७ ही कँसर पीडित स्पर्धकांसाठी स्पर्धा होती. आपण कसे वागतो हे लोक लक्षात ठेवतात. बोलणे गोड असावे. या स्पर्धेत आम्ही सर्वच कॅन्सर पीडित होतो. प्रत्येकीनेच आपल्या शाररिक, मानसिक अडचणींशी झगडा करत यश मिळविले आहे," असे डॉ. कोहोक यांनी नमूद केले.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, "डॉ. नमिता यांची कहाणी फार प्रेरणादायी आहे. आपण लहानसहान गोष्टींना धरून बसतो व आपल्याला न करण्याचे कारणे सुचतात. डॉ. नमिता यांनी कायमच आव्हान स्वीकारत प्रतिकूल परिस्थितीत केलेली यशस्वी वाटचाल ही विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे. हा जसा तुमच्या आयुष्याचा ठेवा आहे तसेच ते ऐकून मिळालेली प्रेरणा आमच्यासाठीही उत्साहवर्धक ठरणार आहे. मुलांनी यातून शिकायला हवे व ठाम, निश्चयाने आपलीही वाटचाल करायला हवी."
-------------------------
फोटो ओळी :
डावीकडून प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, डॉ. नमिता कोहोक व सुषमा चोरडिया.
विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसमवेत डॉ. नमिता कोहोक.