ग्लोबल मार्केट न्यूज नेटवर्क - वाढते नागरिकीकरण पक्ष्यांच्या मुळावर उठत आहे. पक्ष्यांच्या अनेक प्रजाती नष्ट होत आहेत. लोक सहभागाशिवाय कोणतेही संवर्धन पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे पक्षी संवर्धन करताना स्थानिक लोकसहभाग हा खूप मोठा असला पाहिजे. तरच पक्षी जगतील, वाढतील नाहीतर काही दिवसांनी काही पक्षी हे चित्रात, आपल्या साहित्यातच राहतील. निसर्गातील एक महत्त्वाचा घटक असणा-या पक्ष्यांना वाचवण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यायला हवा, असे मत स्वप्निल थत्ते यांनी व्यक्त केले.
उत्तर पश्चिम घाटातील पक्षी, त्यांचे अधिवास, निसर्गातील त्यांचे महत्व, संवर्धन-संरक्षण इत्यादी विषयांवर आधारीत स्वप्निल थत्ते यांच्या व्याख्यानाचे आयोजन वनराईतर्फे करण्यात आले होते. यावेळी प्रास्तविकातून वनराईचे अध्यक्ष रविंद्र धारिया यांनी व्याख्यानाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित वाडेकर यांनी केले, तर आभार अनीश परदेशी यांनी मानले. यावेळी वनराईचे प्रभारी सचिव चंद्रकांत इंगुळकर, मुख्य वित्त अधिकारी सुधीर मेकल, मुख्य प्रकल्प संचालक जयवंत देशमुख व पर्यावरण वाहिनीचे भारत साबळे उपस्थित होते.
यावेळी स्वप्निल थत्ते म्हणाले, विविध रंगांचे, विविध आवाज काढणारे, गाणारे, नाचणारे पक्षी निसर्गात आहेत. पक्ष्यांची विविधता ही खूप प्रचंड प्रमाणात आहे. त्यांची परिसंस्थेमधली भूमिका ही खूप मोठी आहे. अन्नसाखळीमध्ये दुय्यम भक्षक किंवा काही अन्नसाखळ्यांमध्ये तर सर्वोच्च भक्षक आहेत. बीजप्रसार, परागीभवन, स्वच्छता सेवक, नैसर्गिक कीटकनाशक अशा वेगवेगळ्या भूमिका पक्षी निभावत असतात. डोंगराळ भाग व खोरे यातील हवामानामुळे पक्ष्यांचा अधिवास बदलत जातो. झाडांची विविधता व दाटपणा यावर पक्ष्यांचे वास्तव्य अवलंबून असते.
स्वप्निल थत्ते म्हणाले कि, पश्चिम घाट हा जगातील अतिसंवेदनशील आधिवासांमध्ये मोडतो. यामध्ये अनेक प्रकारचे दुर्मिळ पक्षी, प्राणी, कीटक, वनस्पती यांचा समावेश आहे. सुमारे ५०० पक्ष्यांचा प्रजाती येथे आढळतात व यामध्ये तांबूस रानभाई, व्हिगॉर्सचा शिंजीर, निलगीरी कबूतर, पांढरपोट्या नर्तक यांसारखे ३० हून अधिक ' प्रदेशनिष्ठ निवासी ' सापडतात.
उत्तर-पश्चिम घाटात व विशेषकरून महाराष्ट्रात ' सडा ' म्हणजेच लॅटरेटिक प्लॅटू ही रचना आढळते. मध्य व दक्षिण-पश्चिम घाटापेक्षा उत्तर-पश्चिम घाटात पक्ष्यांची विविधता थोडी कमी आहे व त्याचप्रमाणे संरक्षित क्षेत्राचे प्रमाणही कमी आहे. बेसुमार जंगलतोड, खाणकाम, विकासकामे यांचा दबाव येथील जंगलांवर पडत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनिर्बंध रबर व अननस यांच्या लागवडीमुळे महाधनेश, बेडूकतोंड्या, ठिपकेदार वनघुबड यांसारख्या पक्ष्यांचा आधिवास झपाट्याने कमी होत आहे. सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात सावंतवाडी-दोडामार्ग जिल्ह्यांचा समावेश करणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी वनविभाग व स्थानिक निसर्गसंवर्धन करणा-या संस्थांना सर्वतोवरी हातभार लावण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील पर्जन्यछायेच्या प्रदेशातील पावसाचे घटत जाणारे प्रमाण हे पश्चिम घाटाच्या विनाशाचे द्योतक आहे.
स्वप्निल थत्ते गेली अनेक वर्षे पश्चिम घाटात भटकंती करुन तेथील जैवविविधतेचा अभ्यास करत असून पश्चिम घाटातील पक्षी, त्यांचे अधिवास यांवर त्यांचा विशेष अभ्यास आहे. इला फांउडेशन व महाराष्ट्र वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसिद्ध होणा-या त्रैमासिकाचे ते सहाय्यक उपसंपादक आहेत.